व्यसनाधीनता राष्ट्र हितासाठी मारक.- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

व्यसनाधीनता राष्ट्र हितासाठी मारक- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

सध्या जगामध्ये मृत्युच्या कारणांमध्ये व्यसन हे चौथ्या क्रमांकावर आहे.जगभरात दरवर्षी ८ ते १० लाख लोक फक्त तंबाकूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात. जवळपास १६ करोड तरुण वर्ग दारुच्या आहारी गेलेला आहे. आजकाल पुरुष व तरुणांबरोबरच स्त्रिया व मुले यांच्यामध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे.
व्यसनांच्या पदार्थांमध्ये मुख्यतः गुठखा, तंबाखू, दारू तसेच चरस,गांजा,अफू,झोपेच्या गोळ्या किंवा इतर मादक पदार्थ असू शकतात.अलीकडेच इंटरनेट व स्मार्टफोनचीही व्यसनाधीनता होऊ शकते असे म्हटले जातेय.

भारतात व्यसनामुळे युवा पिढी वाया जात आहे. व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असून त्यापासून परावृत्त होण्याकडे आजच्या तरुणांचा कल नाही. आजचा युवक हा देशाचे भविष्य आहे. मात्र व्यसनाधीन युवा वर्ग देश कसा सांभाळणार, असा प्रश्न पडतो. व्यसनाधीनता आणि युवा पिढी यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न.

व्यसन म्हणजे एखादी अशी सवय की, ज्यामुळे मोठय़ा प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही. कोणतीही व्यक्ती व्यसनाधीन होण्यासाठी मद्यसेवन करत नाही. काल्पनिक अथवा वास्तवातील प्रश्नांपासून दूर जाण्यासाठी दारू किंवा अमली पदार्थाचा वापर केला जातो. पैशांचा गैरवापर, मार्गदर्शनाचा अभाव, उत्सुकता, संगत या आणि अशा काही कारणांमुळे व्यसनाधीनता हा मानसिक रोग होतो.

व्यसन एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात आज आपल्या देशातील युवा पिढी अडकलेली आहे. या विनाशकारी वादळाला आत्ताच जर थांबवले नाही, तर कितीतरी नवयुवक आणि युवती नव्या शतकाचा पहिला उगवता सूर्य बघण्यासाठी शिल्लकच राहणार नाहीत. मेंदूला बधीर करणा-या कोणत्याही मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन करणारी व्यक्ती म्हणजेच व्यसनी व्यक्ती. ही व्यक्ती स्वत:च्या पायाने एक एक पायरी उतरत मृत्यूच्या गर्तेत एके दिवशी संपून जाणार आहे हे मात्र निश्चित.
व्यसन म्हणजे एक प्रकारे मानसिक गुलामगिरीच म्हणावे लागेल.

फक्त इच्छाशक्तीच्या बळावर व्यसन सुटू शकत नाही. त्याला योग्य प्रयत्नांची जोड, योग्य मार्गदर्शन तसेच योग्य औषधोपचारांची साथ हवी. प्रत्येक गावात समाजसेवी संस्थांनी हा विषय हाती घेणे, आवश्यक आहे. अन्यथा व्यसनाच्या विनाशकारी जाळय़ामध्ये अडकलेली युवा पिढी या महान देशाचा गाडा ताकदीने ओढून नेण्यापूर्वीच संपून जाईल याची भिती वाटते.

या वाढलेल्या व्यसनांबद्दल कोणी विचारल्यास त्याला "बदलती जीवनशैली" आहे हे उत्तर मिळते. दिवसेंदिवस व्यसनाधीनतेचा हा प्रश्न अक्राळविक्राळ रूप धारण करू लागला आहे. आता हा प्रश्न तर फार गंभीर वळण घेऊ लागला आहे. व्यसन करणे ही आजकाल फॅशन होऊ लागली आहे. यापेक्षाही गंभीर प्रश्न आहे तो वयोगटाचा. पूर्वी काही विशिष्ठ वयोगटात असलेले व्यसन करत असत परंतु आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या व्यसनाधीनतेचे लोण पसरू लागले. काही काळाने त्यात विद्यर्थिनीही सामील झाल्या. मग काय विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघे मिळून निरनिराळी व्यसने करू लागली. सुरुवात सध्या सिगारेट ओढून केली ते थेट मादक पदार्थ घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली. नंतर नंतर तर त्यांना चटकच / गरज भासू लागली. त्यामुळे पैसा कमी पडू लागला. त्याचा परिणाम झटपट पैसा मिळवून देणाऱ्या गुन्हेगारी जगताकडे हा वर्ग आकर्षित झाला व आपली चटक भागवू लागला. काही विद्यर्थिनींनी अनैतिक मार्गाने पैसे गोळा करून आपली गरज भागवू लागल्या. त्यामुळे सिगारेटपासून ते मादक पदार्थाची विक्री करणाऱ्यांची वर्दळ महाविद्यालयीन परिसरात वाढू लागली. हे एव्हढ्यावरच न थांबता याची लागण शालेय विद्यार्थ्यांमध्ये पण पसरू लागली. गरीब घराची मुले-मुली सिगारेट वर आपल्या व्यसनाधीनतेची तहान भागवू लागली तर धनदांडग्यांची मुले-मुली त्यापुढे जाऊन आपली गरज शमवू लागले. महाविद्यालयीन मध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे वाढणारे प्रमाण खरोखरच चिंतनीय आहे. यांच्या मते अभ्यासाचा ताण शिथिल करण्यासाठी आम्ही व्यसनांचे साहाय्य घेतले तर आम्हाला नाही वाटत आम्ही काही चुकीचे करीत आहोत म्हणून. याला जबाबदार कोण हा नक्कीच "मिलियन डॉलर" प्रश्न आहे.

व्यसने लागण्याचे आणखी एक कारण असू शकते व ते म्हणजे सध्या प्रत्येक क्षेत्रात चालू असलेली "जीवघेणी स्पर्धा". आपले ईप्सित साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरील ताणतणावांना सामोरे जावे लागते. या असल्या ताण-तणावातून बाहेर पडण्यासाठी काही वाईट / घातक सवयी नकळत लागतात व त्याचे पर्यवसान व्यसनात होते. कधी कधी या व्यसनामुळे जीवघेणे आजार मागे लागण्याची शक्यता जास्त असते. काही दिवसांपूर्वी एका सर्वेक्षणात काही धक्कादायक निकाल बाहेर आले. या तणावामुळे लागलेल्या व्यसनांमुळे "हृदयविकाराची" लागण झालेल्याची संख्या ३० ते ४० या वयोगटात जास्त आहे. फार कमी तणाव आपोआप येत असतात पण बहुतांशी ताणतणाव हे "दिलेले" असतात. पदोन्नतीसाठी अथवा रू. १० ते १५ हजार पगारवाढीसाठी काही मंडळी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना असे जीवघेणे ताणतणाव देत असतात.

याला नक्कीच बदलेली जीवन शैली कारणीभूत आहे. पण प्रश्न असा आहे की ही जीवनशैली बनविली कोणी याचा विचार होणे चुकीचे गरजेचे आहे. इतर अनेक कारणांबरोबर चंगळवादी जीवनशैली हे महत्वाचे कारण असावे असे वाटते. जो तो आपल्या "करिअरच्या" मागे आहे. आपापली कारकीर्द घडवण्याच्या मागे आहे. त्यामुळे साहजिकच मुलांकडे दुर्लक्ष होते. त्याची कसर ते मुलांना भरपूर पैसे देऊन भरून काढतात. साहजिकच मुले त्याचा विनियोग कसा करतात याच्या भानगडीत ते पडत नाहीत. त्याचबरोबर घरात होणाऱ्या "बिझनेस पार्ट्या" या तर मुलांसमोरच होत असतात. त्या पार्ट्यांतून काय चालते ते वेगळे सांगायची गरज नाही. अगदी सिगारेट पासून स्त्री पुरुष संबंधांपर्यंत सर्व या पार्टीत पाहायला मिळते. आपली मुले-मुली अनुकरणप्रिय असतात. आपण जर असे करीत असु तर आपणच मुलांना व्यसनाधीनतेकडे ढकलतो असं मला वाटतं.

म्हणुन नक्कीच मला असं वाटतं की व्यसनाधीनता ही राष्ट्र हितासाठी मारक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh