माझी पूजा अपूर्ण आहे. By- Nilesh Konde-Deshmukh.

*माझी पूजा अपूर्ण आहे !*
पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो !
पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही ,
*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*
रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो !
पण त्या पांढर्या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही,
*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*
रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो !
पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही,
*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*
रोज मी देवाजवळ दिवा लावतो !
पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही,
*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*
रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो !
पण संसारतापाने मंदपणे जळत असताना
चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही
*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*
रोज मी देवाजवळ कापूर जाळतो !
पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत ,
*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*
रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो !
पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही ,
*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*
रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो !
पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत,
*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*
वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो !
पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही ,
*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*
देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो !
पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद
परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही ,
*तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !*
***** बघ तुला जमतं का *****
तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी.
जीभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण
तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय, बघ तुला जमतं का…
तू मठात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी . तिथे नतमस्तक झाला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात, बघ तुला जमतं का…
तू सोवळं ओवळं मान किंवा नको मानूस, हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण
तुझे आचार मात्र ठेव पवित्र, बघ तुला जमतं का…
तू 11 माळ जप , स्वाध्याय कर, शास्त्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच, बघ तुला जमतं का…
तु मंदिरात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी, त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमधे देव पाहायला नक्की शिक, बघ तुला जमतं का…
संकलन – वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.
मो.नं.- ९८९००१३५२०.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा