तलवारीचा इतिहास. By Nilesh Konde-Deshmukh.


तलवार : (तरवार). एक प्राचीन व परंपरागत शस्त्र. धनुर्वेदातील वर्गीकरणानुसार तलवार हे अमुक्त म्हणजे हातात धरून लढण्यासाठी असलेले एक शस्त्र आहे. तलवारीने शत्रूला भोसकून, फटकारून आणि घाव घालून घायाळ करता येते. पूर्वीच्या काळी पदाती सैनिक व घोडेस्वार द्वंद्वयुद्धासाठी तलवार वापरीत. तलवारीच्या मारामुळे होणाऱ्या दुखापती कमी करण्यासाठी ढाल व चिलखत यांचा उपयोग होत असे. शत्रूच्या तलवारीचे वार स्वतःच्या तलवारीवर झेलून किंवा चुकवून आत्मरक्षण करण्याची प्रथा आहे. पाते व मूठ हे तलवारीचे दोन मुख्य भाग होत. प्रारंभ काळात तलवारीच्या पात्याचा आकार कण्हेरीच्या पानासारखा असल्यामुळे पात्यास पान असेही म्हटले जाते. सामान्यपणे पात्यावरूनच तलवारींचे वर्गीकरण केले जाते. हे पाते मुठीमध्ये बसवून तलवार हाताच्या पंज्यात पकडता येते आणि मुठीमुळे पंज्याचे व बोटांचे रक्षणही होते.

मुठीचेही विविध प्रकार आढळतात. पात्याच्या आकार, प्रकारातील विविधतेवरून ती वापरणाऱ्याची मनोभूमिका कळून येते त्याचप्रमाणे लढाईत तलवार कशा रीतीने हाताळली जात असावी, हे समजते.

अश्मयुगातील दगडी धारदार आयुधापासून तलवार उत्क्रांत झाली असावी. महाभारताच्या शांतिपर्वात ब्रहयाने यज्ञ केला असता ‘अशना’ या कमलासारख्या उल्केतून तलवारीचा जन्म झाला, असे भीष्म सांगतात. शस्त्रास्त्रांचा विकासक्रम लक्षात घेता गदा, कुऱ्हाड, गोफण, धनुष्यबाण व भाला यानंतरच तलवार प्रचारात आली असावी, असे दिसते. सुमेर, भारत, पॅलेस्टाइन या प्रदेशात ख्रि. पू. तिसऱ्या सहस्त्रकात किंवा तत्पूर्वी ४०  सेंमी. लांबीच्या आखूड तलवारी वापरात होत्या. तलवारीला तांबे, कासे यांची पाती आणि हाडांच्या व धातूच्या मुठी बसवीत.

सिंधु संस्कृतिकालात तलवारी होत्या किंवा नाही याविषयी एकमत नाही. भाल्यांची लांब पाने म्हणजेच आखूड तलवारी असाव्यात, असा एक तर्क आहे. यजुर्वेदसंहितेत मात्र लोखंडी आयुधांचा स्पष्ट निर्देश आहे. हर्डोई, बिठूर, हैदराबाद येथील उत्खननांत हडप्पा संस्कृतीमधील तलवारींसारख्या तलवारी सापडल्या आहेत. फोर्ट मनरो येथे इ. स. पू. १२०० या काळची काशाची तलवार सापडली आहे. प्राचीन स्तूप, मंदिरे आणि लेणी यांतील शिल्पांकनांवरून प्राचीन काळच्या तलवारीची कल्पना येते.

वैदिक आणि इतर वाङ्‌मयात उदा., धनुर्वेद, वीरचिंतामणी, बृहत्संहिता, युक्तिकल्पतरु  इत्यादींमध्ये करवाल, असि, निस्त्रिंश, चंद्रहास, खड्‌ग, मंडलाग्र, असियष्टि वगैरे नावे आढळतात. आधुनिक काळात प्रदेश, गाव किंवा विशिष्ट व्यक्तीवरून तलवारी ओळखल्या जातात. उदा., आलेमानी (जर्मनी), मुल्हेरी (मुल्हेर, महाराष्ट्र), हुसेनी, भवानी वगैरे. शुंगकालातील सरळ, रुंद दुधारी व बिनमुठीच्या तलवारींचे स्वरूप भारहूत येथील शिल्पकामात आढळते. कुशाणकालात आखूड, सरळ, त्रिकोणी टोक असलेल्या व कण्हेरीच्या पानासारखे पाते असलेल्या तलवारी होत्या.

गुप्तकालात खंडा तलवार प्रचारात आली. खंड्याची मूठ–ठोला लवंगी आकाराची असते. मध्ययुगातील तलवारीचे स्वरूप अदिचनल्लूर, अमरावती, नागार्जुनकोंडा, अजिंठा, वेरूळ, भूवनेश्वर, बादामी येथील शिल्पे व चित्रे यांतून होते. अरुंद, समांतर पण सरळ, दुधारी पाते आणि साध्या मुठी अशी त्या तलवारीची बनावट दिसते. वाकाटककालीन अजिंठा लेण्यांत दिसणारी तलवार ही टोकाला रुंद असलेल्या पात्याची दिसून येते. तिचे बामियान (अफगाणिस्तान) येथील बुद्धाच्या पाठीमागे असलेल्या चंद्रदेवाच्या तलवारीशी साम्य आहे. कोपीस म्हणजे मुठीखाली अरुंद पण टोकाकडे रुंद होणारे पाते असलेल्या तलवारींचे नमुने जावा–सुमात्रा येथील मंदिरशिल्पांत आहेत. तर खुरपी पात्याच्या तलवारींची दृश्ये अजिंठा–वेरूळ लेण्यांत आढळतात. खुरपी पात्याच्या तलवारी हिक्सॉस (इ. स. पू. अठरावे शतक) यांनी ईजिप्तमध्ये प्रसृत केल्या. खुरपी तलवारी (कुकरी, नायर) आजही केरळमध्ये आढळतात. वीरगळांच्या हातांतील तलवारी खंडा किंवा खुरपी धर्तीच्या आढळतात. तेराव्या–चौदाव्या शतकापासून भारतात इराणी व तुर्की तलवारी येऊ लागल्या. किर्क नर्दबान बिद्र, बेगमी कुम व शुम या इराणी व याटगान कोपीस या तुर्की तसेच घोडेस्वाराची समशेर व तेगू या तलवारी पूर्वी प्रचारात होत्या.

आईन-इ-अकबरीत अशा तलवारींची वर्णने आहेत. मराठ्यांनी स्पेन, इटली, जर्मनी येथे तयार झालेली पाती घेऊन त्यांस हिंदुपद्धतीच्या लवंगी, डेरेदार व खोपडी मुठी बसविल्या. पट्टा, सकेला किंवा धूप आणि किरच या तीन तलवारी मराठी कल्पकतेतून तयार झाल्या आहेत. पात्यांची बनावट सुरुवातीस दमास्कनी या इराणी पद्धतीने व नंतर हिंदुस्थानी पद्धतीने करण्यात येई. पट्टा इतर तलवारींपेक्षा जास्त परिणामकारक आहे. भवानी तलवार ही ‘पट्टा’ पद्धतीची तलवार असावी, असा पाश्चिमात्य तज्ञांचा अभिप्राय आहे. कर्नाटकात ‘आद्य–कट्टी’ नावाची तलवार आढळते. हिचे पाते कोयत्यासारखे असते. टिपूचे सैनिक आद्य–कट्टी वापरीत. नेपाळात खंडा, कोश व कुकरी या प्रकारच्या तलवारी प्रचारात होत्या.

(१) हिंदू कटोरी किंवा लवंगी ठोला असलेली मूठ, (२) जडावकाम केलेली हिंदू-मुस्लिम मिश्र घाटाची मूठ, (३) मंडलाग्र व योनी चिन्हांकित नायर तलवार, (४) मुस्लिम शैलीची मूठ, (५) खोपडी मूठ असलेला पट्टा, (६) सोसून पट्टा, (७) हिंदू पद्धतीचा खंडा, (८) हिंदू कटोरी मुठीचा औरंगजेबाचा खंडा, (९) हिंदू मुठीची द. भारतीय (कुकरी/खुरपी) तलवार, (१०) इराणी मुठीची तलवार.

आजही गुरखा सैनिक हातघाईच्या लढाईसाठी बंदुकीबरोबर कुकरी वापरतो. नागा व असमिया जमातीच्या तलवारीस ’डाव’ म्हणतात. या जमातींच्या वैशिष्ट्याप्रमाणे डावात वैशिष्ट्ये आढळतात. मूलतः डाव हा खंडासदृश्यच असतो. भारतात तलवारीचे पाते व मूठ यांवर कलाकुसर आणि नक्षीकाम करण्यात येई. पात्यावर कुराणातील वचने, स्त्रीयोनी, डोळे, कमळ इत्यादींची चित्रे कोरली जात. म्यान देखील कलाकुसरयुक्त बनविण्यात येई.

जपानी ‘डाईशी’ म्हणजे तलवार हिचे ‘वाकिझाशी’ (आखूड) व ‘कटाना’ (लांब व रूंद पाते) असे दोन प्रकार आहेत. जपानी सामुराई योद्धे या दोन्हीही प्रकारच्या तलवारी बाळगीत. पाश्चिमात्य तलवारी बहुतांशी सरळ, दुधारी, टोकदार पात्याच्या व कटोरी मुठीच्या असतात. जर्मनी, स्पेन व इटली येथे उत्कृष्ट तलवारी बनविल्या जात. ‘व्हायकिंग’ (मुठीपाशी रुंद, दुधारी पटाशीसारखे पाते असलेली व टोकाकडे निमुळती) ‘व्हेनिशियन’ (रुंद व आखूड पात्याची आणि कटोरी मुठीची) ‘सेबर’ (घोडेस्वाराची बाकदार, दुधारी, टोकाशी पसरट असलेली) ‘रेपियर’ (हलकी, पातळ, भोसकण्यासाठी वापरली जाणारी) ‘फलशियन’ (रुंद, पसरट, आखूड पात्याची व चंद्रकोरसदृश्य टोकाची) आणि खलाशाची ‘कटलास’ (आखूड पात्याची व टोकाशी थोडा बाक असलेली) अशा सहा प्रकारच्या तलवारी आढळतात.

पूर्वी तलवार चालविण्याच्या शिक्षणाचा प्रारंभ फरीदग्याने होई. फरीदग्यानंतर तलवार बंदेश (वार आणि डावपेच) लाकडी तलवारीने शिकविले जात. पट्टा चालविण्याचे शिक्षण लाठी–काठीच्या डावांनी दिले जाई. तलवार व पट्टा यांचे तडफी, सरका, डुबी, काटछाट, हूल, गर्दनकाट इ. बंदेशांचा सराव केळीच्या खांबावर केला जाई. महाभारतात बावीस बंदेश सांगितले आहेत. तलवार बंदिस्त ठेवण्यासाठी चामड्याचे किंवा धातूचे म्यान असते. हे म्यान कमरेला अडकविण्यासाठी कमरबंद किंवा कातडी पट्टे असतात.

खंडा, कुकरी वगैरेसारख्या शस्त्रांची पूजा करण्याची प्रथा हिंदुधर्मियांत रूढ आहे. राजपूत, गुरखा व उच्च क्षत्रिय जातींत दुसऱ्या विवाहसमयी खंडा यास नवरदेवाचे प्रतीक समजून त्या काळी विवाहविधी केला जातो. बहुतेक सर्व धर्मांत व समाजांत तलवारीला आजही सांस्कृतिक महत्त्व दिले जाते.

दारूगोळा वापरणारी बंदूक, पिस्तुल इ. प्रचारात आल्यापासून (पंधरावे–सोळावे शतक) तलवारीचा वापर कमी झाला. बंदुकीला संगीन लावून तलवार व भाला यांची उणीव भरून काढण्यात आली. पहिल्या महायुद्धानंतर तलवारीचा वापर जपानखेरीज अन्य देशांत बंद झाला. सध्या परंपरा राखण्यासाठी तसेच लष्करी व पोलीस संचलने आणि राष्ट्रीय समारंभप्रसंगी लष्करी पोलीस व अधिकारी तलवारी वापरतात. लष्करी आणि पोलीस प्रबोधिनी शिक्षणात उच्च क्रमांकित स्नातकांना ‘सन्मान तलवार’ प्रदान करण्याची प्रथा आहे.

संकलन: वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.
मो नं. ९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh