दहावीचा निकाल आणि माझी आई. By-Nilesh Konde-Deshmukh

लिखाण

✍ By- Nilesh Konde-Deshmukh

MO. NO.9890013520

दहावी चा निकाल आणि माझी आई.

खरंतर Online च्या या निकालात आणि  च्या Offline त्या निकालात मुलांच्या आणि पालकांच्या ही खुप संवेदना लपलेल्या आहेत.

माझी आई मोल मजुरी करून आम्हा भावंडांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी नेहमी कष्ट करताना मी पाहिलं आहे. वर्ष भर मुलांना शिक्षण घेत असताना धनदांडग्यांच्या मुलांना लवकर मिळणाऱ्या शिक्षण उपयोगी वस्तू सहज मिळायच्या त्यामुळे त्या मुलांना कदाचित आई वडिलांच्या कष्टांचा गंध नसायचा परंतु आम्हाला मिळणाऱ्या वह्या पुस्तके दप्तर यात आमच्या आईने मोल मजुरी करत असताना येणाऱ्या घामाचा सुगंध असायचा. आणि जणू हा सुगंध हा आम्हाला शिकण्यासाठी कठीण परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी प्रेरणादायी ठरायचा.

ज्यावेळी वेळ वाईट असते नाती साथ देत नाही अशा वेळी परकी माणसं आपल्याला नात्यांपेक्षा जास्त मोलाची वाटतात कारण कदाचित आमची आई घेत असलेल्या कष्टाचे रुपांतर एक दिवस हिरवी गार पालवी फुटणाय्रा आणि स्वताच्या पायावर भक्कम पणे उभं राहून न डगमगणाय्रा वटवृक्षाप्रमाणे होणार याची पुसटशी कल्पनाही त्यांना नसावी.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वर्षभर शिक्षण घेतल्यानंतर एक दिवस निकालाची तारीख कानी पडयची‌. त्या दिवसापासून आमच्या पेक्षा आमची आई च जास्त दडपणाखाली दिसायची. कारण ही तितकेच महत्त्वाचे होते. कारण तो निकाल फक्त आमच्या परिक्षेचा नसायचा तर निकालाचा तो दिवस आईने आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टांना पास नापास ठरवणारा असायचा.

निकालाच्या दिवशी ती शरीराने शेतात मजुरी करत असायची आणि मन मात्र आमच्या निकालाकडे असायचे. तुमचा मुलगा चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला हे कोणीतरी तिला सांगायचं आणि तिच्या आनंदाला उधाण यायचं. त्या दिवसाची वाट पाहत जवळ ठेवलेली ती चुरगाळलेली पैशाची नोट बाहेर काढायची आणि कोणाला तरी सांगुन पेढे वाटून ती आनंदात सांगायची माझा पोरगा पास झाला.

तिच्या आनंदात तिनं सोसलेल्या कष्टांच मोल झालं ही भावना असायची. त्या दिवशी ती उचलून घ्यायची तो दिवस वारंवार यावा यासाठी आम्ही भाऊ ही तेवढ्याच जोमाने पुढील वाटचालीसाठी तयार व्हायचो.

आईनं लहान वयातच पाजलेलं स्वाभिमान नावाचं बाळकडू, परिस्थितीशी लढण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देत राहणार यात शंका नाही.

आज दहावीचा निकाल त्या निमित्ताने आईने केलेल्या कष्टाला पुन्हा ताजे करुन जिवन जगताना या गोष्टींचा विसर न व्हावा या साठी लिखाणाचा हा खटाटोप.

आई…..

✍ तुझ बाळ🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संजीवन समाधी म्हणजे नेमके काय. By-Nilesh Konde-Deshmukh

श्री दिलीप तांबोळकर काका साधकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.By-Nilesh Konde-Deshmukh.

उपजे ते नाशे