अध्यात्म म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास. By-Nilesh Konde-Deshmukh.


कवित्व आणि तत्व
वाचे बरवे कवित्व | कवित्वी बरवे रसिकत्व | रसिकत्वीही परतत्व | स्पर्श जैसा || ३४५|८|ज्ञा.

भाषेमध्ये कविता, कवितेच्या जोडीला रसिकता, आणि रसिकतेला स्पर्श असावा, तत्वज्ञानाचा अशी ही चढती कमान आहे. तत्वज्ञान किंवा अध्यात्म ह्या गोष्टी आपल्या डोक्यावरून जातात, त्या विषयांमध्ये आम्हाला रस नाही असे म्हणणारे लोक एका अर्थाने अनाहूतपणे आपली स्वतःची फसवणूक करत असतात कारण कधीना कधी कामाच्या धबडग्यातून डोके बाहेर पडते तेव्हा मी कोण आहे? मी कोठून आलो? आणि माझे पुढे काय होणार आहे ? असले तीन विचार प्रत्येकाच्या मनामध्ये डोकावतातच. दुःखाच्या प्रसंगात माझ्याच बाबतीत असे का घडले किंवा अनपेक्षितपणे आयुष्याला कलाटणी मिळाल्यावर हे कसे काय घडले बुवा? असे प्रश्नही माणूस काही काळ तरी चघळत राहतो.

शहरातला माणूस निसर्गाच्या सान्निध्यात प्रवासाच्या निमित्ताने गेला आणि त्याचे मन सजग असेल तर निसर्गातल्या वैविध्यपूर्ण सौंदर्याने आणि रचनेने तो प्रभावित होतोच परंतु निसर्गातल्या पशुपक्षी आणि वनस्पतींच्या लाजवाब घडणीने अवाकही होतो. हे कसे झाले, कोणी केले की आपोआप घडत गेले? अरण्यातले मानवरहित जीवन कोण चालवत असेल असा प्रश्न मला लहानपणी सतावत असे.

त्याकाळातल्या माझ्या वर्गातल्या चाळीस मुलामुलींची पुढे पांगापांग झाली. बरीचशी पुन्हा कधी भेटलीच नाहीत. एखादा दुसरा पुढे सार्वजनिक जीवनात चमकला. त्यांची नावे वर्तमानपत्रात येतात ती अशी येतील अशी कल्पनाही त्यावेळेला नव्हती हा अनुभवही आश्चर्यकारकच असतो.

एकेकाळचे जिवलग मित्र पुढे शत्रू झाले या उलट आयुष्यात एखादा अवचित भेटतो त्याच्याशी ऋणानुबंध वाढत जातात, अतीव उत्कट प्रेमातून घडलेली लग्ने पुढे मोडतात, तर स्वभावात तीळमात्र साम्य नसलेली जोडपी आनंदाने संसार करतात ह्या बद्दलही चर्चा घडतात. ज्यांचे सगळेच उत्तम झाले किंवा ज्यांची दुर्दैवाने कधीहीपाठ सोडली नाही अशी माणसे विरळाच. परंतु ही दोन टोके सोडली तर मधला जो मोठा समूह असतो त्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी गोची असतेच. त्यांच्याकडे बघत “परदुःख शीतलम” ह्या न्यायाने थोडेफार समाधानाचे सुस्कारे आपण सोडत असतो. हे सगळे कसे होते ह्याचा विचार करायचा असेल तर हे सगळे कसे सुरु झाले हा वैज्ञानिक प्रश्न विचारल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कारण पुढे जायचे असेल तर इतिहासापासून शिकावे लागते.

आपल्याच नव्हे विश्वाच्या इतिहासाचा अभ्यास किंवा आडाखे म्हणजे अध्यात्म. संस्कृतातला अधि हा शब्द आधी ह्या मराठी शब्दाच्या जवळपास आहे. आत्मा किंवा आत्म म्हणजे मी जर असेन तर माझ्या आधी काय होते हे बघणे म्हणजेही अध्यात्म.

त्याचा शोध म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास.

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.
मो.नं. ९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh