बाबासाहेबांचे वारकरी संप्रदायातील संतावरील प्रेम. By- Nilesh Konde-Deshmukh.

स्वत: आंबेडकरांना भारतीय उपखंडांतील चालिरीती, धर्म संकल्पना, संस्कृती या बद्दल संपूर्ण आणि सम्यक भान होते. त्यांनी पहिले वृत्तपत्र पाक्षिक ‘मुकनायक’ 31 जानेवारी 1920 ला सुरू केले. या पाक्षिकाच्या पहिल्याच अंकात बोधवाक्य म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग वापरला आहे.

काय करू आता धरूनिया भीड ।
नि:शंक हे तोंड वाजविले ॥
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण । 
सार्थक  लाजून नव्हे हीत ॥

तुकाराम महाराजांचा अभंग वापरायचे कारण त्यांना वारकरी संप्रदाय आणि त्याचा प्रभाव याची पूर्ण जाणीव होती. जनसामान्यांच्या प्रबोधनाचे काम करावयाचे तर त्यासाठी त्यांना समजेल अशीच भाषा वापरली पाहिजे. त्या काळात आणि खरं तर आजही तळागाळात वारकरी संप्रदायाने एक अध्यात्मिक सामाजिक परिभाषा रूजवली. आपल्या मुक राहिलेल्या सामाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी आपण नायक बनलोच पाहिजे इतकेच नाही तर प्रत्येक सामान्य मुक जन हा ‘मुकनायक’ बनला पाहिजे हे त्यांना अभिप्रेत होते. आणि त्यासाठी त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग वापरला.
अभंगाच्या पुढच्या ओळी ज्या त्यांनी प्रत्यक्ष वापरल्या नाहीत पण त्यातूनही बाबासाहेबांचा दृष्टीकोन काय आहे हे स्पष्ट जाणवते

आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । 
धीट नीट जीवे होऊनिया ॥
तुका म्हणजे जीवा समर्थांशी गाठी ।
घालावी हे मांडी थापटूनी ॥ 3211॥
(श्रीसार्थ तुकारामाची गाथा, संपादक विष्णुबुवा जोग, ढवळे प्रकाशन आठरावी आवृत्ती, पृ. 667)

वारकरी संप्रदायावर कुणी कितीही टिका केली तरी एक गोष्ट सर्वांनाच मान्य करावी लागते की त्यांनी एका धाग्यात अवघ्या लोकांना बांधून ठेवले. विठ्ठल हे दैवत, महिन्यातील दोन दिवस (एकादशीला) उपवास करणे, मांसाहार न करणे, धुत वस्त्र परिधान करणे, प्रत्येकाच्या ठायी देव आहे हे उमजून एकमेकांच्या पाया पडणे, वर्षातून एक वेळ पंढरीची वारी करणे इतक्या साध्या बाबींवर संप्रदायाचा संपूर्ण डोलारा उभा केला. बाबासाहेबांना ही गोष्ट तीव्रतेने लक्षात आली असणार. आणि म्हणूनच त्यांना आपल्या समाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी तुकारामांच्या ओळी समर्पक पद्धतीने वापराव्या वाटल्या.
बाबासाहेब पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि हे पाक्षिक बंद पडले. पुढे सात वर्षांनी त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक सुरू केले (पहिला अंक दि. 3 एप्रिल 1927) दुसरे पाक्षिक चालू करताना तर बाबासाहेबांनी संत वाङ्मयाचा अभ्यास केल्याचे खैरमोडे यांनी लिहूनच ठेवले आहे. ‘‘ वर्तमानपत्र काढण्याचे मुक्रर केल्यानंतर साहेबांनी मराठी भाषेचा व हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा अभ्यास करण्याचे ठरविले. मुकुंदराय, मुक्तेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास इत्यादी संतांचे वाङ्मय विकत घेवून त्याचा अभ्यास पाच-सात महिन्यांत केला.’’ (डॉ.आंबेडकरांचे अंतरंग, द.न.गोखले, मौज प्रकाशन, 1ली आवृत्ती, पृ.87). आपल्या समाजाच्या दुबळ्यांचा मुक आक्रोश मांडण्यासाठी मी आवाज उठवणार आहे असे म्हणणारे बाबासाहेब आता मात्र नुसता आवाज उठवून शांत बसण्यास तयार नाहीत. प्रत्यक्ष कृती करण्याची गरज मांडताना ते  ज्ञानेश्वरतील कृष्णाने अर्जूनाला केलेल्या उपदेशाचा आधार बाबासाहेब घेतात.

आता कोदंड घेऊनि हाती । आरूढ पां इये रथी ।
देई अलिंगन वीरवृत्ती । समाधाने ॥
जगी कीर्ति रूढवी । स्वधर्माचा मानु वाढवी ।
इया भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥
आतां पार्था नि:शंकु होई । या संग्रामा चित्त देई ।
एथ हे वांचूनि कांही । बोलो नये ॥
(ज्ञानेश्वरी अध्याय 3, ओवी क्र. 189, पारायण प्रत, पृ.70, प्रकाशक-ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, आळंदी)

कुठलीही शंका मनात न ठेवता तू शस्त्र हाती घे आणि ही पृथ्वी वाचव हा संदेश कृष्णाचा अर्जूनाला जसा आहे तसाच बाबासाहेबांचा त्यांच्या अनुयायांना आहे.





अशा या महान मानवाच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.
मो.नं.९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh