वारी हे साध्य नसून वारी हे एक साधन आहे. By-Nilesh Konde-Deshmukh.
वारी हे साध्य नसून वारी हे एक साधन आहे. By-Nilesh Konde-Deshmukh.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज ! सांगतसे गुज पांडुरंग !!
- संत नामदेव महाराज
वारी म्हणजे थोडक्यात वारंवार. सतत फेऱ्या मारणे म्हणजे वारी होय.
वारकरी हा श्री क्षेत्र पंढरपूर ला पांडुरंगाच्या दर्शनासाठी फेय्रा मारतो म्हणजेच ‘पंढरीची वारी’ करतो.
भौतिकातून अभौतिकात, लौकिकातून अलौकिकात, बहिरंगातून अंतरंगात, स्वार्थातून परमार्थात व देहभावातून देवभावात लीन-विलीन होण्यासाठी जी, आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी-कार्तिकी पायी यात्रा होते तिला भागवतधर्मामध्ये ‘वारी’ असे म्हणतात.
वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर अशी केवळ पदयात्रा, असे काहींना वाटतही असेल. परंतु केवळ वार्षिक नियमित पदयात्रा करणे हा झाला लौकिक किंवा बाह्यांगाचा भाग. वारी म्हणजे सातत्य, निरंतरता, अखंड करावयाची साधना ! तपस्या-साधना अनेक प्रकारांनी करता येते. ध्यानधारणा, योगसाधना, जपतपादी अनुष्ठान, मौनव्रत असे विविध मार्ग तपस्येचे असतात. ‘पंढरीची वारी’ ही सुद्धा एक, दिसायला सोपी व सुलभ जरी असली तरी प्रत्यक्षात आचरण्याला फार कठीण अशी ‘उग्रकठोर तपस्याच’ आहे.
वारी म्हणजे फेरा. मनुष्याचा जन्म-मरणाचा फेरा सुरूच असतो. जन्म-मरणाच्या या वारीमधुन मुक्तता मिळावी, दुःख-क्लेश, यातना, पीडा, भय, शोक, अतृप्ती यांनी डागळलेला मनुष्यजन्माचा फेरा कायमचा बंद व्हावा, यासाठीच जी नैष्ठिक पदयात्रा केली जाते तिला ‘वारी’ असे म्हणतात! येथे वारी हे साध्य नसून वारी हे एक साधन आहे.
सध्याच्या काळामध्ये ऋषी मुनींन सारखी डोंगर-दऱ्या गुहांमध्ये राहुन कठोर तपश्चाऱ्या करणे प्रापंचिक मनुष्यास जमणार नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवून संत महंतांनी पंढरीची वारी चा सोपा आणि सुलभ मार्ग समाजासाठी उपलब्ध करून दिला.
आत्मरूपा पासून परमात्मरूपा पर्यंतचा हा अलौकिक प्रवास वारकरी हा न थकता अतिशय आनंदाने पूर्ण करतो. अंधाराकडून उजेडाकडे, अज्ञाना कडून ज्ञानाकडे भक्तिमार्गाने वारकरी हा वारीमध्ये सहभागी होतो. पंढरी मध्ये केवळ विठ्ठलाची मूर्तीची नाही तर एक सकारात्मक उर्जा प्राप्त होते.
नामदेव महाराज असे म्हणतात,
अनंत सूर्याची ज्योतीची निजज्योती ! ती ही उभी मूर्ती विटेवरी !!
वारकरी हा त्याच तेजस चे दर्शन घडावे ही इच्छा मनोभावे धरून वारीही करत असतो.
वारीला खूप मोठी परंपरा आहे.
पायी वारीची परंपरा हजार वर्षांपेक्षा जुनी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीही पंढरीची वारी होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीचे वारकरी होते. ते ज्ञानदेवांना व इतर मुलांना पंढरीच्या वारीला घेवून गेले.
‘साधु संत मायबाप तिही केले कृपादान ।
पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥’
असे खुद्द ज्ञानेश्वरांनी एका अभंगात म्हटले आहे.
नामदेवांनी विठ्ठलाच्या आरतीत आषाढी व कार्तिकी यात्रेचा उल्लेख केला आहे.
‘आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती।।
दर्शन हे कामाचे तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओवाळती।।’
एका अभंगात नामदेव म्हणतात, की पांडुरंगच भक्तांना सांगत आहे, बाबारे आषाढी - कार्तिकीला मला विसरू नका.
‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ।।’
ही परंपरा संत भानुदास महाराज व संत एकनाथ महाराज या संतांनी चालविली. भानुदासांनी तर विजयनगरला नेलेली मूर्ती परत आणली व वारीची परंपरा खंडित होवू दिली नाही.
एकनाथ महाराज ही पायी वारी करीत होते. त्यांनी अभंगात म्हटले आहे,
धन्य धन्य पंढरपूर। वाहे भीवरा समोर।
म्हणोनि नेमे वारकरी। करती वारी अहर्निशी।
त्यानंतर तुकारामांच्या काळातही पंढरीची वारी मोठ्या प्रमाणावर भरत होती. ते म्हणतात,
आषाढी निकट । आला कार्तिकीचा हाट ।
पुरे दोन्हीच बाजार। नलगे आणिक व्यापार।
असे म्हणतात की, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून पंढरीची वारी पायी करत होते.
ज्ञानेश्वर महाराजांचा आजचा जो सोहळा आहे त्यांची सुरूवात मात्र दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हैवतबाबा आरफळकर यांनी केली. त्यांचा जन्म सरदार कुळात झाला होता. ते ग्वाल्हेरहून परत येत असताना चोरांनी गाठले व एका गुहेत कोंडले. तेथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केला. त्याच राजाच्या नायकास मुलगा झाला व आनंदाप्रित्यर्थ त्यांनी हैबतबाबांना सोडले. ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आपण सुटलो. आता उर्वरित आयुष्य ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करू, असा निर्धार करून ते आळंदीला आले व तेथेच राहिले. आळंदीला माउलीच्या समाधीपुढे रात्रीच्या शेजारतीपासून सकाळच्या आरतीपर्यंत ते भजन करीत. त्यांनी मनोभावे माउलींच्या सेवेत आपले आयुष्य घालविले. त्यांच्यापूर्वी माउलीच्या पादुका गळ्यात घालून पंढरपूरच्या वारीला येण्याची प्रथा होती. बाबांनी त्या पादुका पालखीत घालून दिंड्या काढून भजन करीत सोहळा नेण्याची परंपरा सुरू केली. आजचा पालखी सोहळा त्यांच्या परिश्रमाचे व भक्तीचे फळ आहे. हैबतबाबांना खंडोजीबाबा नावाच्या एका महात्म्याने खूप सहाय्य झाले. खंडोजीबाबांचे टाळकरी एक शेडगेबाबा होते. त्यांनी पालखी सोहळा वाढविण्याच्या कामी खूप कष्ट केले. या पालखी सोहळ्यास हत्ती, वगैरे लवाजमा औंधच्या राजाकडून येत होता. त्याला त्या काळाचे राजे, पेशवे मदत करीत असत. पुढे इंग्रजांचे राज्य आल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे.
आजतागायत ही परंपरा वारकरी चालवत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा