शिवरायांचे विवाह. By-Nilesh Konde-Deshmukh
#शिवरायांचे विवाह :-
शिवरायांनी जे आठ विवाह केले ते हौस मौज मजा करण्यासाठी नाही.तर,प्रत्येक विवाहापाठीमागे एक तर शहाजी राजेंचा एक तर जिजाऊ आऊ साहेबांचा नाहीतर शिवरायांचा काही ना काही तरी राजकीय डावपेच होताच.' स्थितप्रज्ञ ' असा राजा ' श्रीमानयोगी '
कोणत्याही स्थितीत स्वराज्य स्वराज्य हे एकच ध्येय.
1) सगुणाबाईसाहेब :-
शिवरायांचा पहीला विवाह बंगळूर मुक्कामी दिनांक 16 एप्रिल 1640(शके 1552 विक्रमनाम संवत्सर वैशाखमासी शुक्ल पंचमी)रोजी शिर्के यांचे कन्येशी शहाजीराजेंच्या आज्ञेप्रमाणे झाला.शिर्के घराणे हे उत्तर कोकणातील निजामशाही मुलुखातील होते.अंबा नदी ते सावित्री नदी ह्यामधील सह्याद्री लगतच्या भुभागास 'शिरठाण' म्हणुन ओळखला जातो.हेच राजे शिर्के निजामशाहीच्या पतनानंतर शहाजीराजेंच्या पदरी होते.यांचीच कन्यका शहाजीराजेंनी सुन म्हणुन करुन घेतली.
जन्म-1633
मृत्यू-1670
2) सईबाईसाहेब -
शिवरायांचा दुसरा विवाह मुधोजी निंबाळकर यांची कनिष्ठ कन्या राजसबाई उर्फ सईबाई यांच्या बरोबर सन 1641 ह्या वर्षी झाला.सईबाईंचे वय यावेळी 7 वर्षाचे होते.हा विवाह विजापुरी मोठ्या थाटामाटात झाला यावेळी राजमाता जिजाऊं सह सर्व भोसले परीवार व निंबाळकर परीवार हजर होता.याची नोंद विजापुर दरबारातील काही कागदांवर अढळते(हिजरी 1051 ).शिवदिग्वजय बखर सांगते की हा विवाह पुणे मुक्कामी झाला परंतु,हे तितके विश्वसनिय वाटत नाही..कारण,मुरार जगदेवाने नुकतेच पुणे तसनस करुन टाकले होते.1641 या वर्षात शिवराय तितके सधन नव्हते की ते वर्हाडी मंडळी, जेवण व लग्नाचा इतर खर्च पेलु शकतील.भोसले(शाहाजीराजे),जाधव(जिजामाता) घराण्याचा सबंध निंबाळकर घराण्याशी राखण्यासाठी हा विवाह झाला होता.हे हाती पुराव्यांनुसार समजते.
जन्म-1634
मृत्यु-5 सप्टेंबर 1659
3) पुतळाबाईसाहेब :-
शिवरायांचा तिसरा विवाह हा इ.स.1653 मध्ये विठोजी मोहीते अमीरराव नेवासकर ह्यांची कन्या यांच्याशी पुणे मुक्कामी झाले.पुढे अपत्यहीन राज्ञी पुतळाबाईसाहेब जनमानसांच्या विस्मृतीत गेल्या व प्रथमपुत्र पाप्त राज्ञी सईबाईसाहेब या जनमानसांच्या स्मृतीत राहील्या.या विवाहास शहाजीराजे हजर नव्हते.हा विवाह म्हणजे निराळा एक राजकारणाचा डाव होता.अनेक तात्कालीन इतिहासकार पुतळाबाईसाहेब या पालकर घराण्यातील होत्या अस वर्णन करतात पण ते चुक आहे.कारण,मल्हार रामराव चटणीस बखर व ग्रँड डफ यांच्या मराठ्यांच्या चरीत्रात पुतळाबाई ही मोहीत्यांची कन्या होती असे नमुद आहे.
शिवापुर शकावली व मराठा साम्राज्याची छोटी बखर सांगते की,शिवरायांच्या निधनानंतर संभाजीराजेंच्या परवानगीने आषाढ शुद्ध एकादशी शके 1602 (27 जुन 1680) रोजी शिवरायांचे जोडे घेऊन पुतळाबाई सती गेल्या.शिवतिर्थ रायगडावर सति जाणार्या पुतळाबाई या एकमेव राणी व स्री होय.....
जन्म-1646
मृत्यु-27 जुन 1680
4) लक्ष्मीबाईसाहेब :-
शिवरायांचा चौथा विवाह हा इ.स. 1656 रोजी जावळी मोहीमेच्या वेळी गुप्तपणे झाला. राज्ञी लक्ष्मीबाईसाहेब या विचारवंत विचारे यांच्या कन्या होय.(लग्नाआधि नाव जयश्री नंतर लक्ष्मीबाईसाहेब)
पण, हे विचारे नक्की कोण या बाबत मात्र इतिहास मौन पाळुन आहे.विचारे म्हणजे जावळीचे हनुमंतराव मोरे हे होत.हे हणमंतराव मोरे चंद्रराव मोरेंच्या पदरी दिवाण व भाऊ म्हणुन होते.त्यांना मारल्याशिवाय जावळीचे शल्य सुटणार नव्हते हे शिवराय जाणुन होते.त्यांच्याजवळ एक सुंदर कन्या उपवर म्हणुन होती.रघुनाथ बल्लाळांकरवे सोईरीकीचे बोलने लावले व भेट होतास कट्यारीचे वार करुन ठार मारीले.(91कलमी बखर,सभासद बखर,कोंढवी परागण्याचा करीना)
_हा काही विश्वासघात नव्हता तर हे थोर राजकारण होते.त्याच प्रसंगी शिवरायांनी लक्ष्मीबाईसाहेबांशी विवाह केला.
जन्म-1641
मृत्यु-1670
5) सकवारबाईसाहेब :-
शिवरायांचा पाचवा विवाह हा कृष्णाजी गायकवाड यांच्या कन्या सकवारबाईसाहेब यांच्याशी श्री सातवाहन शके 1578 दुर्मुख संवत्सर माघ शुद्ध पक्षी(1657) रोजी राजगडावर झाला.
हे कृष्णाजी म्हणजे किल्ले राजगडाच्या 'दिवाण इ आम' द्वार बंकी होत.
जन्म-1650
मृत्यु-1705
6) काशिबाईसाहेब :-
शिवरायांचा सहावा विवाह हा शके 1579 वैशाख शुद्ध पंचमी (8 एप्रिल 1657) रोजी राजगडावर झाला.
काशिबाईसाहेब या संताजी जाधव यांच्या कन्या होय.पण,संताजी जाधव या नावाची गल्लत करु नका.हे संताजी जाधव म्हणजे,जिजामातांचे बंधु अचलोजी ,त्यांचे द्वीतीय पुत्र शंभुसिंह उर्फ सुजनसिंह उर्फ कल्याणसिंह उर्फ संताजी जाधव यांची कन्या काशिबाईसाहेब..... या शिवरायांच्या धर्मपत्नी होय..
जन्म-1648
मृत्यु-16 मार्च 1674
7) गुणवंताबाईसाहेब :-
शिवरायांचा सातवा विवाह शके 1579 हेमलंबी संवत्सर वैशाख शुद्ध द्वादशी (15 एप्रिल 1657) रोजी शिवाजी इंगळे यांची कन्यका गुणवंताबाईसाहेब यांच्याशी झाला.जिजामातांबरोबर विदर्भातुन जी घराणी आश्रयास आली त्यातील वर्हाड मधील चिखली तालुक्यातील करवंड येथील हे इंगळे घराणे
होय.सन 1648 मध्ये झालेल्या खळद -बेलसर युद्धात फतहखानासोबत याच इंगळेंनी निकराचा लढा दिला होता.याच झुंझार घराण्यातील इंगळे कुलोत्पन्न गुणवंताबाईसाहेब या शिवरायांच्या सातव्या धर्मपत्नी होत.
जन्म-1648
मृत्यु-1670
8) सोयराबाईसाहेब :-
शिवरायांचा हा आठवा व शेवटचा विवाह तब्बल दिड वर्षा नंतर कर्नाटकात झाला.भिकुजी चव्हाण -मोहीते यांचे द्वीतीय पुत्र शंभाजी मोहीते पोगरवाडीकर यांच्या कन्यका सोयराबाईसाहेब यांच्याशी 1658 मध्ये झाला.
(इथे एक लक्षात घ्या की,स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहीते उर्फ हंसाजीराव मोहीते हे सोयराबाईसाहेबांचे चुलत बंधु होते.म्हणजेच,भिकुजी चव्हाण-मोहीते यांचे तृतीय चिरंजीव धारोजी मोहीते यांचे पुत्र)
आता तुम्हाला इथे सर्वात महत्वाची शंका निर्माण झाली असेल की,जर सोयराबाई या सर्वात शेवटच्या राणी होत तर मग राज्याभिषेक समयी त्या पट्टराणी कशा...?
तर,राज्ञी सो़यराबाईसाहेब या सर्वात लहान व सर्वगुणसंपन्न तसेच लवकरच पुत्रवती झाल्यामुळे सईबाईंच्या निधनानंतर राज्ञी सोयराबाई या शिवरायांच्या अवडत्या पत्नी झाल्या.पुत्रवती असल्यामुळे पट्टराणी म्हणुन राज्याभिषेकसमयी मान मिळाला.अपत्यहीन राज्ञी प्रजाजनांचे पुत्रवत पालन करु शकत नाही असा धर्मसंकेत आहे.(हे मी नाही तर तात्कालिन साधने वर्तवतात)
जन्म-1651
मृत्यु-आक्टोबर 1681( इतिहासकारांत मतभेद )
_मला जमेल तसे व हाती असलेल्या साधनांच्या आधारे मी शिवरायांचे आठ विवाह या बद्दल येथे माहीती दिली ती,खुपच अपुरी आहे.जागा नसल्यामुळे अगदी थोडक्यातच लेखाची मांडणी माझ्या मित्रांच्या आग्रहास्तव केली आहे.चुकभुल देणे घेणे.
nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520
संदर्भ -
शिवरायांच्या अष्टराज्ञी
लेखक-आप्पा परब
स्वराज्याचे शुर सेनानी
लेखक-दामोदर मगदूम
सभासद बखर
जेधे शकावली
मल्हार रामराव चिटणीस बखर
91 कलमी बखर
मराठा साम्राज्याची छोटी बखर
शेडगांवकर भोसले बखर
शिवभारत
शिवकालीन पत्रसारसंग्रह
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा