समुद्रमंथन. By-Nilesh Konde-Deshmukh

-----------------
समुद्रमंथन
-----------------
समुद्रमंथनाची कथा

महाभारतामध्ये समुद्रमंथनाची कथा आली आहे. 
ती तेथे जनमेजय राजाने वैशंपायन ऋषींना सांगितली आहे. 
ही कथा 'अमृतमंथन' या नावाने इंडोनेशियातल्या जावा बेटात लिहिल्या गेलेल्या 'हरिविजय' या काव्यग्रंथात आणि भागवत पुराणातल्या अष्टम स्कंधातील सातव्या अध्यायात आहे. ही कथा खालीलप्रमाणे.

मेरू नावाच्या एका तेजस्वी पर्वताच्या एका शिखरावर देवतागण एकत्र होऊन अमृतप्राप्तीसाठी चर्चा करत होते. तेव्हा भगवान नारायणांनी देवांना सांगितले," देवांनी आणि दैत्यांनी (दानवांनी) समुद्रमंथन करावे, त्या मंथनातून अमृतप्राप्ती होईल.
" तेव्हा देवांनी नारायणांच्या सल्ल्यानुसार अकरा सहस्र योजने उंच आणि खोल असलेला मंदार पर्वत उपटून काढण्याचा प्रयत्‍न केला, पण ते शक्य झाले नाही. तेव्हा देवगण परत भगवान नारायण आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. आणि तेव्हा त्यांनी शेषनागाला मंदाराचल उपटण्यासाठी सांगितले. महाबली शेषनागाने मंदाराचल उपटला. सर्व देवगण मंदाराचलासह समुद्रकिनारी गेले.

समुद्रकिनारी गेल्यावर त्यांनी समुद्रदेवाला सांगितले की, "आम्ही तुझे मंथन करणार आहोत." तेव्हा समुद्रदेव म्हणाले, "जर तुम्ही मलापण अमृतातील हिस्सा द्याल तर मी मंथनाचे कष्ट सहन करीन." तेव्हा भगवान नारायणांनी कूर्मावतार घेतला आणि मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेतले. आणि समुद्रमंथन सुरू झाले.

या प्रकारे देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. वासुकी नागाच्या मुखाकडील बाजूस दैत्य आणि शेपटीकडील बाजूस देव होते. पुन्हा पुन्हा वासुकी नाग ओढला जात असल्यामुळे त्याच्या मुखातून अग्नी ज्वाला आणि धूर बाहेर आला. त्या धुराने ढग तयार होऊन ते ढग थकलेल्या देवांवर पर्जन्यवृष्टी करू लागले. पर्वतावर झाडांच्या घासल्या जाण्यामुळे आग लागली. तेव्हा भगवान इंद्रानी पर्जन्यवृष्टी करून पर्वत शांत केला.
 वृक्षांचे दूध आणि औषधी रस समुद्रात आले. औषधांच्या अमृतासमान रस आणि दूध व सुवर्णयुक्त मंदाराचलावरील मणी यांच्या एकत्रीकरणाने पावन झालेल्या जलाला स्पर्श केल्याने देवांना अमरत्व प्राप्त होऊ लागले.

त्या संमिश्रणाने समुद्राचे पाणी दूध बनले. 
त्या दुधापासून तूप  तयार झाले. त्यानंतर देव - दानवांनी अजून जोराने मंथन केले. 
त्यावेळी समुद्रातून अगणित किरणांचा व शीतल प्रकाशी व श्वेतवर्णी असा चंद्र प्रकट झाला. चंद्रानंतर
 देवी लक्ष्मी आणि देवी सुरा उत्पन्न झाले.
 त्याचवेळी श्वेतवर्णी उच्चैःश्रवा घोडा निर्माण झाला. 
भगवान नारायणांच्या वक्षावर सुशोभित होणारा उज्ज्वल कौस्तुभमणी, सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनु व कल्पवृक्ष तयार झाले.
 लक्ष्मी, सुरा, चंद्र आणि उच्चैःश्रवा हे सर्व आकाशातून देवलोकी गेले. 
त्यानंतर हाती अमृताचा कमंडलू घेवून धन्वंतरी प्रकट झाले. 
हा चमत्कार बघून दानवांमध्ये 'हे माझे, हे माझे' असा गोंधळ झाला. त्यानंतर चार दातांनी युक्त विशाल ऐरावत हत्ती  निर्माण झाला. त्यास इंद्राने घेतले. याच समुद्रमंथनातून कालकूट विष (हलाहल) निर्माण झाले होते. भगवान ब्रह्माच्या विनंतीवरून भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले. तेव्हापासून ते नीलकंठ या नावाने प्रसिद्ध झाले.

अमृत आणि लक्ष्मी या दोघांच्या प्राप्तीसाठी दानवांमध्ये फूट पडली. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून दानवांकडून अमृत घेतले आणि ते देवतांना दिले. 
देवतांनी ते अमृत प्राशन केले. तेव्हा राहूसुद्धा देवतांचे रूप धारण करून अमृत पिऊ लागला. अमृत राहूच्या कंठापर्यंत गेले असता चंद्र आणि सूर्यामुळे राहूचे रूप उघड केले. लगेचच भगवान विष्णूनी आपल्या चक्राने त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. तो पृथ्वीवर पडून तडफडू लागला. तेव्हापासूनच त्याचे सूर्य व चंद्राबरोबर वैमनस्य राहिले. त्यानंतर देव आणि दानवांमध्ये मोठे युद्ध झाले. त्यावेळी भगवान विष्णूंचे नर आणि नारायण अशी दोन्ही रूपे दिसू लागली. सुदर्शन चक्राने दानव कापले जाऊ लागले. तेव्हा दानव हे पृथ्वीत आणि समुद्रात लपले. देवांची जीत झाली. मंदाराचलाला पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले गेले. देवांनी व इंद्राने सुरक्षिततेसाठी भगवान नराकडे अमृत दिले.

ही आहे समुद्रमंथनाची कथा.
----------------------------------------------
या मंथनातून चौदा रत्ने तयार झाली.
-----------------------------------------------
ती पुढीलप्रमाणे:

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुराधन्वन्तरिश्चन्द्रमाः।

गावः कामदुहा सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः।

अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोमृतं चाम्बुधेः।

रत्‍नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात्सदा मङ्गलम्।

लक्ष्मी
कौस्तुभ
पारिजात
सुरा (वारुणी)
धन्वंतरी
चंद्र
कामधेनू
ऐरावत
अप्सरा
उच्चैःश्रवा
कल्पवृक्ष
हलाहल
अमृत
शंख
------------------------------------------
देवी लक्ष्मीचा जन्म कसा झाला
------------------------------------------

देवांनी राक्षसांच्या मदतीने अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले. बरीच वर्षे चाललेल्या या मंथनातून सर्वप्रथम विष प्रकट झाले. या विषाच्या ज्वाला एवढ्या तीव्र होत्या की त्यामुळे तिन्ही लोकांत हाहाकार माजला. तेव्हा शंकराने त्या ज्वाला आपल्या कंठात धारण केल्या.

 मंथनात चौदा रत्ने प्राप्त झाली. त्यामध्ये श्री रंभा, विष, वरूण, अमृत, शंख, धेनू, गजराज, धनू, कल्पद्रुम, धन्वंतरी, शशी, बाज आणि मणी त्यापैकी एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला.
 
या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले. भगवान विष्णूने लक्ष्मीचा आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले. तेव्हापासून लक्ष्मीला विष्णूप्रिया, विष्णू पत्नी किंवा विष्णू वल्लभा असे म्हटले जाऊ लागले. समुद्रमंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव तिला देण्यात आहे. लक्ष्मीचा रंग गोरा आणि चार भुजा आहेत. तिने किरीट मुकूट आणि दिव्य वस्त्रालंकार धारण केले आहेत. लोक तिला ऐश्वर्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री मानतात. घुबड हे तिच्या वाहनाच्या रूपात आहे. ती स्वभावाने अतिशय चंचल आहे. 
 
कमल थिर न रहीम कही यही जानत सब कोय।
पुरूष पुरातन की वधु क्यूं न चंचला होय।।
 
लक्ष्मी कधीच एका जागेवर स्थिर राहत नाही. परंतु, ती विष्णू पत्नी असल्यामुळे विष्णूच्या आराधनेबरोबर तिचीही नियमीतपणे आराधना केली जाते. तिथे ती स्थिर रूपात निवास करते. तिचे आसन कमळ असल्यामुळे तिला कमला किंवा कमलासना असेही म्हटले जाते. कार्तिक कृष्णा अमावस्येला दीपावलीच्या रात्री महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी विशेष रूपात विश्वभ्रमणासाठी निघते. महालक्ष्मीची उपासना केल्यामुळे दु:ख, दारिद्रयापासून मुक्ती मिळून ऐश्वर्य प्राप्त होते.

nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh