तुळशी विवाह. By-Nilesh Konde-Deshmukh



🔶 तुळशी विवाहामागील अर्थ 🔶

तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते. तुळशी म्हणजेच 'तुलां सादृश्यंस्यति नाशयती इति तुलसी।' देवाला पूर्णपणे वरण्याची क्षमता राधा, सत्यभामा, रूक्मणी व सोळा हजार पट्टराण्यांमध्येही नाही. 

देवाला वरण्यासाठी जो पवित्र गंध व श्रध्दा, सात्विक एकांत हवा तो तुळशीत आहे. तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापी सत्तेला वृक्षातील चेतनेची करूण हाक असा होतो. या विवाहामागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. हा विवाह पृथ्वीचे सुख-समृध्दी भरपूर पाऊस व चांगले पीक या सोबतच लोककल्याणाची आस या गोष्टींचे प्रतीक आहे. 

आषाढीला झोपलेले देव जेव्हा जागे होतात, त्यावेळी हरीवल्लभा तुळशी त्यांची प्रार्थना ऐकते. तुळशी विवाह देव जागे होण्याच्या काळातील पवित्र सोहळा मानला जातो. तुळशी विवाह संपूर्ण वैष्णवी चेतनेद्वारा पाहिलेले एक महास्वप्न आहे, ज्यात देव स्वत: खाली उतरतात व या पृथ्वीतलावर अणूरेणूंना तेजाने प्रकाशमय करतात. तुळशी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो. तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत पोहोचते. यामुळे तुळशीला सामान्यांचा कल्पवृक्ष संबोधतात. आपल्यात देवांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नसते. तुळशी आपले दु:ख ऐकून ते देवांपर्यंत पोहचवते, असे मानले जाते. म्हणूनच तुळशी व‍िवाह करविला जातो. 

म्हणूनच या भूतलावर असलेले दु:ख-दारिद्र्य, रोग-राई, भय, द्वेष, नैसर्गिक आपत्ती यापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्वजण मिळून तुळशीला साकडे घालू या .

"तुळशीचे पान. एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळशी माऊली
नाही आणिक साधन, एक पूजन तुळशीचे
न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळशीसी 
योगायोग न लगे काही, तुळशीवाचुनी देव नाही"

अशाप्रकारे संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.

एकंदरीत भारतीय समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे. समुद्रमंथनातून  जेंव्हा अमृत निघाले तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. प्रत्येकाच्या दारी तुळशीवृंदावन असतेच. नित्य नियमाने तिची पूजा केली जाते सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते देवळात परमेश्वराला तुळशीपत्र वाहिले जाते. आजकाल जागेअभावी वृंदावन बांधणे शक्य नाही म्हणून मातीच्या कुंडीत तुळशीचे रोप लावतात. तुळशी ही कृष्णध्वज राजाची कन्येच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे नाव पडते. तुळशीचे महत्त्व आणि माहात्म्य अनन्यसाधारण आहे. देवपूजा श्राद्ध यासाठी तुळस अवश्य लागते. भगवान श्रीविष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशीला हिरप्रिया म्हणतात.  

तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.

🔶 स्वरूप 🔶

घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची वा तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कर्ता स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीविवाह केला जातो. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात. नित्यनेमाने त्याला पाणी घालून वाढवतात. मग तिचा विवाह लावतात. या विवाहात तुळस ही वधू, बाळकृष्ण वर, आणि ऊस हा मामा असे मानले जाते. त्यासाठी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीभोवती रांगोळी काढतात. तुळशीच्या चारही बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव तयार करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची ,फुले, चिंचा, आवळे ठेवतात. तुळशीच्यासमोर पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. संध्यकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाट, मंगलाष्टक, मणीमंगळसूत्र, ओटीचे सामान या साहित्यासमवेत सर्व विवाहविधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते.

🔶 आख्यायिका 🔶

याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सती पतीव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात.

ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.

🔶 तुळशीचे औषधीय गुण 🔶

भारतीय समाजात तुळशीला एवढे मानाचे स्थान देण्याचे कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छवासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते, त्यामुळे हवा शुद्ध रहाते ती कफनाशक व पाचक आहे सर्दी, पडसे, कफ, खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे. तुळशीची पाने, आले व गूळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो. चहा कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले तुळशीची पाने जेवल्यानंतर चावून खाल्यास पचन चांगले होते. तुळशीरस नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते. रक्तातील, कोलस्ट्रोल कमी होते. कोलायटिस, अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे काडे, मेदवृद्धी, डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत स्मरणशक्ती वाढवण्यास तुळस उपयुक्त आहे.

nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh