साहित्यात गुढीपाडव्याचा By-Nilesh Konde-Deshmukh





गुढी पाडव्याचा पहिला संदर्भ पुराणांमध्ये मिळतो. ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली तो आपला पहिला वर्षदिवस होय. इंद्राने याच पाडव्याच्या दिवशी दधिची ऋषींच्या अस्थींच्या योगे बनविलेल्या वज्राने वृत्रासुराचा वध केला.


रामायण काळात श्रीरामांनी आपल्या राज्यकारभाराला या शुभदिनी आरंभ केला. शालिवाहनाने आपला नवीन शक या दिवसापासून सुरू केला.


आता मराठी साहित्यात गुढी पाडव्याचा उल्लेख कुठे केला आहे ते पाहू. हे साहित्य अर्थातच शंभूराजांच्या हौतात्म्य दिनाच्या शेकडो वर्षे अगोदरपासून रचले जात आहे..


ज्ञानेश्वरी – अध्याय ४ था ओवी ५२ वी


अधर्मा ची अवधी तोंडी I

दोषांची लिहिली फाडी II

सज्जनां करवी गुढी I

सुखाची उभवी II


ज्ञानेश्वरी – अध्याय ६ वा ओवी ५२ वी

ऐके संन्यासी तोचि योगी I

ऐसी एकवाक्यतेचि जगी II

गुढी उभविली अनेगीं I

शास्त्रांतरीं II


ज्ञानेश्वरी – अध्याय १४ वा ओवी ४१० वी

माझी अवसरी ते फेडी I

विजयाची सांगे गुढी II

येरु जीवीं म्हणे सांडी I

गोठी यिया II


 लीळाचरित्र -पंडित म्हाइंभट सराळेकर


(इ. स . १२७८ च्या आसपास)


लीळा २०८ मधील उल्लेख –

” देमती तुरंगम आरोहणी मध्ये – …. “तेथ बाईसासे भाचे दाएनाऐकू होते : तेयापुढे सांगितले : मग तेंही सडामार्जन करविले ; चौक रंग माळीका भरविलीया : गुढी उभविली : उपहाराची आइती करविली : आपण घोडे घेऊनि सम आले … ” असा उल्लेख आहे


संत चोखा महाराज अभंग चौदावे शतक


टाळी वाजवावी गुढी उभारावी

वाट हे चालावी | पंढरीची ॥

(श्री सकल संतगाथा, खंड १ ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे)


संत तुकाराम महाराज


तुकाराम महाराजांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन करणारे जे अभंग लिहिले आहेत ते शासकीय गाथेत अखेरचे १०० अभंग आहेत. त्यांना बालक्रीडेचे अभंग म्हणतात. त्यात किमान पाच वेळा गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे.


गोकुळीच्या सुखा I

अंतपार नाही लेखा II

बाळकृष्ण नंदा घरी I

आनंदल्या नरनारी

गुढिया तोरणे करिती कथा गाती गाणे II

-ओवी २८३९ क्र.


रोमांच गुढिया डोलविती अंगें भावबळें खेळविती सोंगें रे

तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे या विठोबाच्या अंगसंगें रे

-(ओवी.१९२ क्र.)


शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं | चेंडू वनमाळी घेउनि आले

आली दारा देखे हरुषाची गुढी | सांगितली गुढी हरुषें मात II

-(ओवी.४५५५ क्र.)


कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते, ते सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

नेणे वर्णधर्मजी आली समोरी अवघीच हरी आळिंगिली

हरि लोकपाळ आले नगरात सकळांसहित मायबाप

पारणे तयांचे जाले एका वेळे देखिले सावळे परब्रह्म

ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती गुढिया उभविती घरोघरीं

घरोघरीं सुख आनंद सोहळा सडे रंग माळा चौकदारी (अ.४५५६ क्र.)


याशिवाय शिवकालीन निवाड्यांमध्येसुद्धा हा उल्लेख सापडतो.


शिवकालीन महजर


शिवचरित्र साहित्य खंड १ मध्ये एक महजर सापडतो. हा महजर सुहूर सन खमसेन अलफ, शके १५७१ साली म्हणजे इसवी सन १६४९/१६५० सालचा आहे, या महजरात गुढीयाचा पाडवा असा स्पष्ट उल्लेख आहे.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने- विसावाखंड- लेखांक १७६, पृष्ठ क्र.२३४ ते २३८ यात एक निवाडा दिला आहे. त्यात पान क्र. २३८ वर, फिर्यादीला पुरावा म्हणून प्राचीन कागद दाखविण्यास सांगितले आहेत. त्या आधारे पान क्र. २३९ वर शके मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्त कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी को मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी एक व गहू व गुढीयाचे पाडव्यास कुडाव एक देऊ म्हणोन पत्र लेहून दिल्हे यास वर्षे आज तागायत १४८ होतात.

शिवकालीन पत्र सारसंग्रह, लेखांक मधील पत्र नारायण शेणवी याने आपल्या धन्याला म्हणजे मुंबईच्या गव्हर्नरला ४ एप्रिल १६७४ म्हणजे चैत्र शु. ८ शके १५९६ ला लिहिले आहे. यात निराजी पंडित पाडव्याकरिता आपल्या घरी आला असा स्पष्ट उल्लेख आहे.


गुढीपाडवा या सणाला अनन्यसाधारण महत्व आणि पावित्र्य आहे कारण हा वर्षारंभ आहे. या दिवशी शालिवाहन शक बदलते.यातून प्राचीनत्व ध्यानी यावे.


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.


तूर्तास; छत्रपती शंभूमहाराजांच्या दुर्दैवी व अमानुष हत्येचा आणि गुढीचा काहीही संबंध नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh