धर्म म्हणजे काय ? By-Nilesh Konde-Deshmukh

धर्म म्हणजे काय ?

एकीकडे ‘धर्माविना तरणोपाय नाही’, तर दुसरीकडे ‘धर्म म्हणजे अफूची गोळी आहे’, अशी आत्यंतिक विरोधी वचने ऐकून वा वाचून सर्वसामान्य व्यक्तीचा गोंधळ उडतो. तसेच धर्म म्हटले की, बहुतेकांना हिंदु, मुसलमान, खिश्चन, बौद्ध इत्यादी शब्द आठवतात, तर काही जणांना भारतात निधर्मी राज्य असल्याची आठवण होते. त्यामुळे धर्म म्हणजे एक अस्पृश्य विषय असे त्यांना वाटते. प्रस्तूत लेखात नेमक्या याच प्रश्नावर अर्थात् ‘धर्म म्हणजे काय ?’ यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
 

धर्म : व्युत्पत्ती, व्याख्या आणि अर्थ

श्री शंकराचार्यांनी धर्माची पुढीलप्रमाणे व्याख्या केली आहे – `समाजव्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे, या गोष्टी ज्याच्यामुळे साध्य होतात तो धर्म.’

१. ‘धर्म’ म्हणजे `रिलिजन’ नव्हे !

इंग्रजी भाषेत धर्माला योग्य असा शब्दच नाही. रिलिजन (Religion)’ हा शब्द ‘रेलिगेट् (Relegate)’ या क्रियापदावरून बनला आहे. ‘रेलिगेट्’ म्हणजे ‘खालच्या पायरीला पाठवणे’. ‘ज्यामुळे आपण खालच्या पायरीला जातो’, तो म्हणजे धर्म’, असा त्याचा अर्थ होईल; म्हणून हा शब्दच अयोग्य आहे. याउलट ‘धर्म’ शब्दाचा अर्थ आहे, ‘ज्यामुळे आपण वरच्या पातळीला जातो तो’. धर्म हा शब्द निरनिराळ्या धर्मग्रंथांत निरनिराळ्या अर्थांनी वापरलेला आहे. धर्म शब्दाच्या अर्थाची व्याप्ती समजावी; म्हणून त्याच्या काही प्रमुख व्युत्पत्ती, व्याख्या आणि अर्थ पुढे दिले आहेत.
तुर्यावस्था प्राप्त होईपर्यंत खर्‍या अर्थाने धर्माची ओळख होतच नाही. तोपर्यंत जे समजते, ते शब्दांतील असते. तुर्यावस्था म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडची चतुर्थावस्था, म्हणजेच ध्यानावस्था.

२. समाजाच्या संदर्भातील

२ अ. ‘धृ धारयति’ म्हणजे धारण करणे, आधार देणे. ‘धृ’ या धातूपासून धर्म हा शब्द बनला आहे.
‘धरति लोकान् ध्रियते पुण्यात्मभिः इति वा धर्मः ।’
अर्थात् जो लोकांना धारण करतो किंवा जो पुण्यात्म्यांकडून धारण केला जातो, तो धर्म होय.
२ आ. धारणाद्धर्ममित्याहुः धर्मो धारयति प्रजाः ।
– महाभारत, कर्णपर्व, अध्याय ४९, श्लोक ५०
अर्थ : प्रजेचे, पर्यायाने समाजाचे धारण करतो, तो धर्म होय.
२ इ. धारणाद्धर्म इत्याहुः धर्मेण विधृताः प्रजाः ।
यस्माद्धारयते सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।।
अर्थ : धारणामुळे ‘धर्म’ असे नाव प्राप्त झाले आहे. प्रजा धर्माने धारण केल्या जातात. याच कारणास्तव सर्व स्थावर-जंगम त्रैलोक्याचे धारण धर्म करत असतो.
२ ई. धारणादि्वदि्वषां चैव धर्मेणारञ्जयन्प्रजाः ।
तस्माद्धारणमित्युक्तं स धर्म इति निश्चयः ।।
अर्थ : धर्म हा शत्रूंचे (अधर्माचे) नियमन करून न्यायाला अनुसरून प्रजेचे अनुरंजन करतो. अशा रितीने तो प्रजेचे, म्हणजे समाजाचे, धारण करतो; म्हणून त्याला ‘धर्म’ असे म्हणतात.
२ उ. ‘आर्यांनी समाज सुस्थिर राखण्यासाठी चातुर्वर्ण्यसंस्था, आश्रमकर्तव्ये, विवाहसंस्था, दायविभाग (वडिलोपार्जित मिळकतीची वाटणी) इत्यादी ज्या गोष्टी निर्धारित केल्या, त्या सर्वांना मिळून ‘धर्म’ असे म्हणतात.’

३. व्यक्तीच्या संदर्भातील

३ अ. यतोऽभ्युदयनिःश्रेयससिदि्धः स धर्मः ।
– कणादऋषी (वैशेषिकदर्शन, अध्याय १, आहि्नक १, सूत्र २)
अर्थ : ज्याने अभ्युदय (म्हणजे ऐहिक उन्नती. यात आरोग्य, विद्या, संपत्ती, संतती आणि ऐक्य या गोष्टी येतात.) साधतो; म्हणजे ‘लौकिक आणि पारमार्थिक जीवन चांगले होते आणि ‘निःश्रेयस’ म्हणजे ‘मोक्षप्राप्ती’ होते’, त्याला ‘धर्म’ असे म्हणतात.
३ आ. प्रभवार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् ।
यः स्यात्प्रभवसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ।।
– महाभारत, शांतीपर्व, अध्याय १०९, श्लोक १०
अर्थ : जिवांचा उत्कर्ष व्हावा एवढ्यासाठीच धर्म कथन केला आहे. ‘जो उत्कर्षाने युक्त असेल तोच धर्म’, असा सिद्धान्त आहे.
ऐहिक उत्कर्ष, पारलौकिक सुख आणि त्याची साधने एवढे मिळून अभ्युदय समजला जातो. ज्या स्थितीत अनिष्टापेक्षा इष्टच अधिक असते, अशी स्थिती म्हणजे अभ्युदय होय. मोक्ष, शाश्वत किंवा सर्वोच्च साध्य याला निःश्रेयस म्हणतात. ज्या स्थितीत कशाचीच अपेक्षा रहात नाही वा संपूर्ण समाधान होते, अशा स्थितीला निःश्रेयस म्हणावे. ही दोन साध्ये ज्या साधनांनी प्राप्त होतात, तो धर्म समजावा.
३ इ. मनुष्याने धर्माचरण केल्यास त्याची वर्तमान जन्मात आध्यात्मिक उन्नती होते. धर्माचरण करणार्‍या मनुष्याला मृत्यूनंतरही चांगली गती मिळते, म्हणजेच त्याला महा, जन, तप अशासारख्या उच्च लोकांत स्थान मिळते.
३ ई. ‘आपण ज्या अज्ञानात (रज-तम गुणांच्या भ्रमात) सापडलो आहोत, त्याच अज्ञानाचा (सत्त्वगुणाचा) आधार आपल्याला देऊन अज्ञानातून आपल्याला सोडविण्याची संशयातीत (बेमालूम) युक्ती म्हणजेच धर्म होय.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
३ उ. ‘ब्राह्मणग्रंथांत धर्म शब्दाचा अर्थ आश्रमधर्म असा असून ‘त्रयो धर्मस्कन्धाः…’ या उपनिषद्वाक्यांवरून तो कळतो. धर्म शब्दाचा अर्थ ‘वर्णाश्रमानुसार व्यक्तीकडे आलेले किंवा व्यक्तीने अंगीकारलेले कर्तव्य’ असाही आहे.’
३ ऊ. धर्मो मद्भकि्तकृत्प्रोक्तः ।
– श्रीमद्भागवत, स्कन्ध ११, अध्याय १९, श्लोक २७
अर्थ : माझी (भगवंताची) भक्ती करणे म्हणजेच धर्म.
३ ए. ‘धर्म म्हणजे प्रत्यक्ष आत्मानुभूती.’ – स्वामी विवेकानंद

४. समाज आणि व्यक्ती अशा दोन्हींच्या संदर्भातील

४ अ. जगतः स्थितिकारणं प्राणिनां साक्षात्
अभ्युदयनिःश्रेयसहेतुर्यः स धर्मः ।
– आद्य शंकराचार्य (श्रीमद्भगवद्गीताभाष्याचा उपोद्घात)
अर्थ : सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात.
४ आ. ‘धर्मशास्त्रकारांच्या मताप्रमाणे ‘धर्म’ या नात्याने शब्दाची व्याप्ती एक उपासनेचा पंथ एवढीच नसून, त्या शब्दात प्रत्येक मनुष्याने व्यक्ती या नात्याने व्यक्तीचा (स्वतःचा) विकास करण्याकरिता आणि समाजाचा एक घटक या नात्याने मानवी समाजाचा विकास करण्याकरिता करावयाच्या कृत्यांचा आणि पाळावयाच्या निर्बंधांचा समावेश होतो.’

५. धर्म आणि अधर्म यांतील भेद

५ अ. धर्म म्हणजे आग्रह, तर अधर्म म्हणजे दुराग्रह.
५ आ. ‘प्रश्न : धर्माला अधर्माचे आणि अधर्माला धर्माचे स्वरूप केव्हा येते ?
श्री गुलाबराव महाराज : विकाराने केलेला धर्मही अधर्मच होतो आणि उत्तम कार्याकरिता केलेला अधर्मही धर्म होतो. गाय आणि साधू यांसाठी खोटे बोलण्यानेही धर्म घडतो.’
राष्ट्राच्या संदर्भात धर्माचा विचार केला, तर धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे; म्हणून समाजाचे जीवन धर्माधिष्ठित असेल, तरच राष्ट्र वैभवशाली आणि चिरंतन ठरते. धर्माचे अधिष्ठान नसलेले राष्ट्र, पर्यायाने राष्ट्रातील समाज कालांतराने मृत्यूमुखी पडेल.

६. धर्माचे वैशिष्ट्ये

प्रामाण्यबुदि्धर्वेदेषु साधनानामनेकता ।
उपास्यानामनियमः एतद् धर्मस्य लक्षणम् ।। – लोकमान्य टिळक
अर्थ : वेदांना प्रमाण मानणे, साधनेचे अनेक मार्ग उपलब्ध असणे, उपासनेविषयी अवाजवी कट्टरता नसणे, हे (हिंदु) धर्माचे लक्षण आहे.
या लेखातून आपल्याला ‘धर्माची महती अन् त्याचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व’ लक्षात आले असेलच !
सद्यस्थितीत धर्माविषयी असलेले अपसमज दूर होणे आवश्यक आहे. सर्व मानवजात एकत्र येण्यासाठी धर्म हा अपरिहार्य आहे. या दृष्टीकोनातून या लेखमालिकेत धर्म शब्दाचा अर्थ, महत्त्व, प्रकार, धर्माची विविध अंगे आणि रहस्य, धर्मसिद्धान्त, धर्म आणि संस्कृती अन् नीती यांतील भेद, धर्मग्लानी आणि अवतार, धर्माच्या संदर्भात भारताचे महत्त्व, धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना इत्यादी विविध सूत्रांचे विवेचन केले आहे.

           जय श्रीराम
nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh